नेशन न्युज मराठी टिम.
डोंबिवली/प्रतिनिधी -समाज माध्यमांचे जसे फ़ायदे आहेत. त्याच प्रमाणे तोटेही आहेत काही लोक समाजमाध्यमाचा उपयोग करून प्रगती साधतात तर काही गुन्हेगार वृत्तीचे लोक गुन्हे करण्यासाठी सुद्धा समाजमाध्यमांचा वापर करताना दिसत आहेत.त्यामुळेच समाज माध्यमांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. डोंबिवलीत पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरील ओळखीचा फायदा घेत नवी कोरी दुचाकी वाहन चोरल्याचे समोर आले आहे. दरम्यान डोंबिवलीतील राम नगर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली असून त्याने आणखी चार ठिकाणी दुचाकी चोरी केल्याचे समोर आले आहे.
इन्स्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर आपण भेटूया असे अनिकेतने डोंबिवलीत राहणारे फिर्यादी करण सागवेकर यांना सांगितले. त्यांनतर ठाकुर्ली रेल्वेस्टेशन जवळ आपण भेटूया असे ठरल्यानंतर करण आपली नवीन दुचाकी घेऊन अनिकेतला भेटायला आला. यावेळी तुझी नवीन गाडी चालवून बघतो असे सांगून अनिकेत रपेट मारायला गाडी घेऊन गेला तो परत आलाच नाही. बराच वेळ अनिकेतची वाट बघून थकलेल्या करणने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत आपली तक्रार नोंदवली. दरम्यान सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी अनिकेतला कल्याण परिसरातून सापळा रचून अटक केली.
याआधी देखील अनिकेतने अशाचप्रकारे ठाणे शहरातील कोपरी आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील दुचाकी चोरी केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिल्याचे त्याने तपासा दरम्यान सांगितले. त्यामुळे आरोपी अनिकेत वाडकर हा फिरस्ता आहे.
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक भराडे करत आहेत.