नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
धुळे/प्रतिनिधी – स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण करून प्रशासनात काम करण्याचे बऱ्याच मुला-मुलींचे स्वप्न असते. प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणारे हे विद्यार्थी ग्रामीण भागातील तसेच गरीब कुटुंबातील असतात. त्यामुळे काहींकडे तर स्पर्धा परीक्षेची फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. तरीही अफाट कष्ट आणि मेहनत करण्यासाठी ग्रामीण भागातील ही मुलं-मुली तयार असतात.
मात्र महाराष्ट्र शासन एक हजार रुपये फी स्पर्धापरीक्षेसाठी आकारात असते यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. तसेच 120 रुपयात वर्षभरातील पोलीस भरतीसह सर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात याव्यात,पेपर फुटीसह भरती प्रक्रियेला येणारी स्थगिती, शासन निर्णयानुसार वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांची मुदत वाढ करण्यात यावी. अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. प्रशासनाने वयोमर्यादेसह परीक्षा फी कमी करण्याच्या प्रश्नावर लवकर निर्णय न घेतल्यास निवडणुकीवरच बहिष्कार टाकू असा इशारा विद्यार्थ्यांनी या वेळेस केला आहे. तर दुसरीकडे महिलांसाठी पोलीस भरतीत जास्तीत जास्त जागा काढून त्याबाबत प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा महिला विद्यार्थिनींनी केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमुळे एकमेकांचे विरोधी पक्ष सध्या एकदुसऱ्यावर टीका करण्यात व्यस्त आहेत. पण निवडणुकी एवढेच महत्वाचे या विद्यार्थ्यांचे भविष्य आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या लेकरांचा विचार सरकारने करावा आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय द्यावा अशी मागणी सर्व विद्यार्थी करत आहेत.