नेशन न्यूज मराठी टिम.
बीड/प्रतिनिधी– बीडच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
स्पर्धेच्या या युगात पालक विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अधिक भार देतात. आणि याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आरोग्यावर प्रकर्षाने जाणवतो. काही दिवसांपूर्वी बीड मध्ये एका खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर बीडचा शिक्षण विभाग खळबडून जागा झाला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी अध्यापनाच्या वेळेत बदल केला असून आता केवळ पाच ते साडेपाच तासांपेक्षा अध्यापनाची वेळ नसावी, असं या आदेशात म्हटले आहे. हा आदेश इंग्रजी शाळांना देखील लागू असणार आहे.काय आहे जिल्हा परिषदेचा आदेश बघुयात
काही शाळांमधून विद्यार्थ्यांना वेळेव्यतिरिक्त शाळेत अधिक वेळ बसून अभ्यास घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी तणाव मुक्त राहत नाहीत. शाळेत अध्यापनाचे पाच ते साडेपाच तासापेक्षा अधिक नसावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने हसत खेळत त्यांच्या क्षमतेनुसार अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया घडून आणावी.
शाळेत मानसिक तणावामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अनेक आंदोलन केली होती. जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांचा विचार करून नवीन अध्यादेश लागू करावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आता जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतल्याने शिक्षण तज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बीडच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होऊन त्याचा पाठपुरावा होणे तितकेच गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त आपलं करिअर घडवण्यास मदत होईल.