नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यात दर वाढीनंतर कांदे उत्पादक शेतकरी व व्यापारी यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत निषेध व्यक्त केला. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा लिलाव करताना देखील बंदी आणली जात आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकतीच उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली.
कांदा प्रश्नी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली असून राज्यातील संपूर्ण पदाधिकारी लासलगाव येथे दाखल होत लासलगाव बाजार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा बाजारात विक्री करू नये, उर्वरित कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट एकाच वेळी जमा करावा या प्रमुख तीन मागण्या संघटनेच्या वतीने सादर करण्यात आल्या.
या तीन मागण्या पणनमंत्र्यांच्या बैठकीत मान्य न झाल्यास थेट दिल्ली गाठत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत दिल्लीमध्ये ठिय्या मांडण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे.