नेशन न्यूज़ मराठी टिम.
कल्याण/डोंबिवली – केडीएमटी सेवेतील बसेस शहराच्या बाहेर चालविल्या जातात. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरीकांना त्याचा उपयोग होत नाही. रिक्षा चालक आणि खाजगी वाहने अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. परिवहनच्या बसेस आधी सुरु होत्या त्या बंद का केल्या? असा जाब शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन व्यवस्थापकाला विचारला आहे. त्वरीत महापालिकेच्या अंतर्गत परिवहन सेवा सुरु करुन प्रवाशांना दिलासा द्यावा, अन्यथा परिवहन कार्यालयास टाळे ठोकू. असा इशारा परिवहन व्यवस्थापनास दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिष्टमंडळ प्रशासनास भेट दिली. परिवहनचे व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडे शिष्टमंडळ आले होते. शहरातील नागरीकांनी परिवहन सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. नवे मार्ग सुचविले आहे. जे पूर्वी चालू होते. जे काही कालावधीपासून बंद आहे. ते मार्ग सुरु करण्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मार्ग आम्ही सुरु करणार आहोत. २०१७ मध्ये असलेली बसेसची संख्या आणि आजची बसेस संख्या यात कमालीचा फरक आहे. आमच्याकडे ९० बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस रस्त्यावर धावतात. अशी माहिती परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांनी दिली. आणि येणाऱ्या काळात यांच्या मागणीची अंमलबजावणी करू, असे आश्वासन देखील देण्यात आले आहे. या प्रसंगी महिला आघाडीच्या विजया पोटे, हर्षवर्धन पालांडे, अरविंद पोटे, रविंद्र कपोते, विजय काटकर, दत्तात्रय खंडागळे आदी उपस्थित होते.