कल्याण/ प्रतिनिधी – कोरोनाचा अटकाव करायचा असेल तर त्यासाठी लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविणे अत्यंत गरजेचे आहे. शहरात सध्या कार्यरत असणारी लसीकरण केंद्र ही अपुरी पडून नागरिकांना लसीकरणाची समस्या निर्माण होऊ नये यासाठी वसंत व्हॅली परिसरात असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कल्याण (प.) मतदारसंघातील कोविड रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी कोरोना लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दुर्गाडी किल्ला- भवानी चौक परिसर तसेच दुध नाका व गफूर डॉन चौक परिसरातील नागरिकांना सद्या कार्यरत असलेली लसीकरण केंन्द्रे अपुरी पडू नये, यासाठी नव्याने वसंत व्हली युनिव्हर्सिटी चौकातील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे. जेणेकरून सर्व सामान्य मध्यमवर्गीय व गृहसंकुलात राहणाऱ्या रहिवाशांना लसीकरण करून घेण्यास अडचण निर्माण होणार नाही.त्यामुळे या ठिकाणी तातडीने कोरोना लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.