नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – बालक मंदिर संस्थेची प्राथमिक शाळा व कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कलेचे अनन्य साधारण महत्व आहे. कलेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक बौद्धिक विकासात वाढ होते. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळून सृजनशीलता वाढीस लागते. विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कल्याण मधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेने गेली सहा वर्षे या जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले आहे. यंदाचे हे स्पर्धेचे सातवे वर्ष आहे. यंदाचे स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी ही स्पर्धा बालक मंदिर संस्था कल्याण, प्राथमिक शाळा व कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
नेहमीप्रमाणे इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला. गेली दोन वर्ष कोरोनामुळे शाळाच बंद असल्याने या स्पर्धेचे आयोजन करणे शक्य झाले नव्हते. पण यावर्षी मात्र स्पर्धेला सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व शाळांतील जवळपास 13 हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. शाळेतील सर्वच शिक्षक आणि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी कल्याण येथील अत्रे रंगमंदिर नाट्यगृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विजय सरकटे उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध कवी व गीतकार प्रवीण दवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना मुलांना घडविताना या विषयावर संबोधित केले. याप्रसंगी बालक मंदिर संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळांतील कला शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अजित सहस्रबुद्धे, डॉक्टर योगेश जोशी व सुरेश सरोदे यांनी उत्तम परीक्षण करून स्पर्धा यशस्वी होण्यास मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकुंभ सर व आभार प्रदर्शन मीनाक्षी सरोदे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे, वक्ते व परीक्षकांची ओळख अनुक्रमे पानसरे सर, घाटे सर व सुबोध कुलकर्णी यांनी केली. ईशस्तवन व स्वागत गीत विद्या घुले व कामिनी पाटील यांनी बसवले. स्पर्धा प्रमुख म्हणून निकुंभ सर व गवारे सर यांनी काम पाहिले.