नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – राज्यातील काही भागात माहे ऑक्टोबर २०२२ पासून गोवर रुबेला रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभुमीवर ठाणे जिल्हयात गोवर उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे, रुग्ण संख्या व मृत्यू दर यावर नियंत्रण राखणे, प्रतिकारशक्ती वाढविणे याकरिता शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दि. १५/१२/२०२२ ते २५/१२/२२ व १५/०१/२०२३ ते २५/०१/२०२३ या कालावधीत विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आशा स्वंयसेवक, अंगणवाडी सेविका व एएनएम यांच्या द्वारे राबविण्यात येणार आहे.
गोवर हा आजार लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. गोवरचा आजार लहान मुलांना होऊ नये म्हणून यावर प्राधान्याने काम करण्याच्या सूचना सर्व नागरी आरोग्य केंद्रास देण्यात आल्या आहेत.दि. १५ ते २५ डिसेंबर 22 या कालावधीत आयोजित विशेष लसीकरण मोहिमेसंदर्भात सुक्ष्म नियोजन करुन लसीकरणापासून वंचित बालकांचे १०० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेत ९ महिने ते ५ वर्ष या वयोगटातील जे लाभार्थी गोवर लसीकरणापासुन वंचित असतील किंवा त्याच्या वयोमर्यादेनुसार गोवर लसीकरणास पात्र असतील अशा लाभार्थ्यांना संख्येनुसार आणि क्षेत्रानुसार अतिरिक्त लसीकरण सत्राचे नियोजन करुन लस देण्यात येईल. तसेच जे लाभार्थी गोवर लसीकरणापासुन वंचित असतील त्या लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी व ही विशेष गोवर रुबेला मोहिम राबवित असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांचे मार्फत करण्यात येत आहे.