नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नागपूर/प्रतिनिधी – सध्या सर्वच ठिकाणी उन्हाळा वाढला आहे. विदर्भात राज्यातील सर्वात जास्त उकाडा असतो, माणसांसोबतच प्राणीही उन्हामुळे हैराण झालेले चित्र येथे दिसून येत असते. या उन्हापासून प्राण्यांचा बचाव करण्यासाठी नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात खास व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरच्या या प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण, मगर, अजगर यांचा समावेश असलेले 200 हून अधिक वन्य प्राणी आहेत. उन्हापासून प्राण्यांच्या बचावासाठी विशेष लक्ष दिले जाते व त्या प्रमाणे व्यवस्था केली जाते.
नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबट्यांच्या पिंजऱ्यांमध्ये हिरवी जाळी लावण्यात आली असून, पिंजऱ्यांसोबत गोणी बांधून या गोण्या सतत ओल्या ठेवल्या जात आहेत. हिरव्या जाळ्यांसोबतच पिंजऱ्यांमध्ये कुलरही बसवण्यात आले आहेत. पिंजऱ्यातील तापमान सामान्य राहावे यासाठी हे करण्यात आले आहे. एवढेच नाही तर अस्वल आणि बिबटच्या पिंजऱ्यात ठराविक अंतराने पाण्याचे फवारे देऊन थंड ठेवण्यात येत आहेत. नागपुरातील तापमान ४० अंश ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्राण्यांना थंड ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तापमान ४५ अंशाच्या आसपास गेल्यास प्राण्यांना त्यांच्या अन्नात ग्लुकोज दिले जाते, प्राण्यांना रसदार फळ दिली जात आहेत. जेणेकरून या प्राण्यांना उष्माघाताचा धोका कमी करता येत असल्याचे महाराजबाग प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापकांनी सांगीतले