नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
गोंदिया/प्रतिनिधी – उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर ही बातमी वाचून तुमचा विचार बदलू शकतो. कारण सुट्टीनिमित्त घर बंद ठेऊन जाण्याचे वाईट परिणाम गोंदियातील संजय ढगे यांच्या कुटुंबाला भोवले आहे. आमगाव मधील शाहू महाराज नगरमध्ये राहणारे संजय ढगे यांच्या घरी घरफोडी ची घटना घडली. या घटनेत ढगे यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.
संजय ढगे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घरफोडी ची घटना घडली. या घरफोडीत त्यांच्या घरातील लाखोंचा ऐवज कपाट फोडीत लंपास केला गेला. हा सगळा प्रकार झाला त्या दिवशी संजय ढगे हे नोकरीनिमित्त गोंदियाला गेले होते तर तेव्हा त्यांची पत्नी व लहान मुले हे काही कामानिमीत्त पुण्यात होते. अज्ञात आरोपीने ढगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी तिजोरीचे लॉकर तोडून सोन्या-चांदीचे एकूण 27 लाख 72 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आमगाव येथे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चव्हाण हे करत आहेत. घरातून कुठेही जात असताना कोणत्याही प्रकारचे दागिने, रोख रक्कम ठेवू नये तसेच अनोळखी व्यक्तीबद्दल काही माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन आमगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी नागरिकांना केले आहे.