नेशन न्यूज मराठी टीम.
गोवा/प्रतिनिधी – ‘सिया’ हा आपल्या सामाजिक न्यायव्यवस्थेचे प्रतिबिंब दाखवणारा प्रभावी चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे अन्याय झालेल्या व्यक्तींची मानवी बाजू रेखाटण्याचा एक प्रयत्न आहे, अशा शब्दांत या चित्रपटाचे दिग्दर्शक मानसी मुंद्रा यांनी त्यांच्या चित्रपटाचे वर्णन केले आहे. ‘सिया’ ही न्यायासाठी निर्दयी पितृसत्ताक समाजाच्या विरोधात लढा देणाऱ्या मुलीची आतडे पिळवटून टाकणारी कथा आहे. आंखो देखी, मसान आणि न्यूटन यासारख्या काही उत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मनीष मुंद्रा यांनी ‘सिया’ या चित्रपटासाठी प्रथमच दिग्दर्शनाची जबाबदारी शिरावर घेतली आहे.
गोवा येथे सुरु असलेल्या 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या ‘टेबल टॉक्स’ या संवादात्मक चर्चासत्रात प्रसार माध्यमे आणि महोत्सवाच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना मनीष मुंद्रा म्हणाले की, न्याय मिळविण्यासाठी पीडितांना ज्या वेदनादायक परिस्थितीमधून जावे लागते ती समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. “आपण सर्वांनी पीडितांची तीच वेदना आणि दुःख समजून घेतले पाहिजे, त्यातून आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून घडण्यासाठी पाठबळ मिळेल,” ते म्हणाले.
बलात्काराच्या घटनेतील पिडीतेला सहन करावे लागणारे भय आणि वेदना यांचा आत्म्याला मुळापासून हलवून सोडणारा अनुभव सांगणारा ‘सिया’ हा चित्रपट उत्तर भारतातील ग्रामीण भागातल्या तरुण मुलीच्या जीवनात वास्तवात घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे. लैंगिक अत्याचाराला बळी पडल्यानंतर ही मुलगी न्यायासाठी लढा देण्याचा निर्णय घेते.ती न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे धाडस दाखवते आणि मुठभर ताकदवान लोकांच्या हातातील बाहुले झालेल्या सदोष न्याय व्यवस्थेविरुध्द चळवळ उभी करते याचे चित्रण यात आहे.
अशा प्रकारच्या घटनांमध्ये कायद्याची लढाई लढताना पिडीत व्यक्तीला समाजाकडून क्रूरतेने बाजूला करण्यात येते या आपल्या समाजातील सर्वात मोठ्या पेचप्रसंगाबाबत बोलताना मनीष म्हणाले की, लोकांना पहिले पाऊल उचलण्याचे धाडस होत नाही. जरी एखाद्या वेळेस त्यांनी असे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला तरी त्यांना त्या कारणाने कल्पनातीत वेदना सहन कराव्या लागतील आणि त्यासाठी फार मोठ्या धैर्याची गरज लागेल. “यातून आपल्या सामाजिक न्याय व्यवस्थेचे दर्शन घडते,” ते म्हणाले.अशा समस्यांच्या बाबतीत आपली चिंता फारच अल्पजीवी असते असे त्यांनी पुढे सांगितले. अशा घटना आपण लगेचच विसरून जातो आणि पिडीत व्यक्तीचे सांत्वन न करताच आपापली आयुष्ये पुढे जगायला सुरुवात करतो.
समाजातील नकारात्मक बाबी पाहण्याऐवजी विविध सकारात्मक पैलूंचे वर्णन करण्यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर मनीष मुंद्रा म्हणाले की, ‘सिया’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील सत्य गोष्टी मांडता येतात हे महत्त्वाचे आहे. “हा चित्रपट म्हणजे केवळ दुःख नाही.आमचा चित्रपट भावपूर्ण आहे. त्यात सत्य सांगितले आहे आणि या सत्यात वेदना, आनंद, आशा आणि निराशा अंतर्भूत आहे.” कुठल्याही गोष्टीचे नेहमीच कौतुक आणि टीका दोन्ही होत असते, मात्र आपण सकारात्मकतेवर भर दिला पाहिजे आणि चित्रपटांमध्ये समाजातील सत्याचे दर्शन घडविले पाहिजे. “चित्रपट निर्मितीची ही माझी शैली आहे, वास्तववादी चित्रपटांचे आयुष्य खूप मोठे असते आणि असे चित्रपट लोकांच्या मनाला भिडतात,”ते पुढे म्हणाले.
पदार्पणातील सर्वोत्तम फिचर फिल्म या पारितोषिकासाठी ‘सिया’ हा चित्रपट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील फिक्शन फिचर फिल्म प्रकारच्या 6 इतर चित्रपटांसह स्पर्धेत आहे. चित्रपट निर्मात्यांची पुढची पिढी पडद्यावर कोणते विषय सादर करण्याची संकल्पना करत आहे हे यावरून दिसून येते. 53 व्या इफ्फी मध्ये भारतीय पॅनोरमा विभागात फिचर फिल्म श्रेणीत ‘सिया’ चित्रपट सादर करण्यात आला. या चित्रपटातील सीता आणि महेंद्र ही प्रमुख पात्रे अनुक्रमे अभिनेत्री पूजा पांडे आणि अभिनेता विनीत कुमार यांनी रंगविली आहेत.
चित्रपटाची माहिती
दिग्दर्शक: मनीष मुंद्रा
निर्माता: दृश्यम फिल्म्स
पटकथाकार: मनीष मुंद्रा
सिनेमॅटोग्राफर: रफी महमूद आणि शुभ्रांशु कुमार दास
संकलक: महेंद्र सिंग लोधी
कलाकार : पूजा पांडे, विनीत कुमार सिंग
Related Posts
-
दहा वर्षाच्या मुलीची जन्मदात्या पित्याकडूनच हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - जागतिक' स्तरावर…
-
झोपड्या वाचविण्याचा लढा माझा आहे- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - रेल्वेने घरं रिकामी करण्याच्या…
-
बेजबाबदार पोलिसांवर कारवाई करावी, एकत्र येऊन लढा देऊ - सुजात आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे - राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ होत असून हल्लेखोरांना…
-
बाईक टॅक्सी या अवैधरित्या प्रवासी वाहतूक देणाऱ्या वाहनांमधून प्रवास न करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बाईक…
-
दोन तरुणांनी उभारला लढा रक्तदानाचा, वाचवले शेकडो कोवीड रुग्णांचे प्राण
कल्याण/ प्रतिनिधी - कोरोनाच्या परिस्थितीत बेड, ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजेक्शनसोबत आणखी…
-
जातीय अत्याचारविरोधी न्यायाचा लढा सुरु ठेवत आंदोलनाचा ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/ प्रतिनिधी - राज्यात दर दिवशी…