नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – मणिपूर येथे कुकी आणि मैतई या दोन समूहांमध्ये संघर्ष सुरू आहे, त्यातूनच कुकी या आदिवासी जमातीमधील दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुप्पी साधली असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॅा.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार तसेच ठाणे-पालघर विभागिय अध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, ठाणे शहर कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आयोजन करण्यात आले. या आंदोलनात तोंडावर काळ्या फिती बांधून शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या प्रसंगी सुहास देसाई म्हणाले की, मणीपूरमधील घटना ही फक्त दोन महिलांशी संबधित नाही तर समस्त समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना आहे. त्यामुळे नैतीकता असेल तर केंद्र सरकारने पायउतार व्हावे असे मत व्यक्त केले.