नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी येणाऱ्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवार देऊ नये असं वक्तव्य केलं होतं. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, ‘रोहित पवार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसमावेशक विचार करायला शिकले पाहिजे केवळ जातीपुरता विचार करून चालणार नाही. केवळ मी आणि माझ्या जातीच्या लोकांच्या हातात सत्ता राहिली पाहिजे, ही मानसिकता आता सोडून दिली पाहिजे. वंचित बहुजन घटकातील विविध समाजांना सत्तेच्या रिंगणात येण्याची संधी मिळू दिली पाहिजे.
फक्त मीच सगळं ओरबाडून खाईल ही मानसिकता आता टाकून द्यावी. तुमचा पक्षाचे तीन तेरा वाजले आहेत. शरद पवारांच्या सभेपेक्षा अजित पवारांच्या सभा मोठ्या होत आहेत, त्यामुळे हा सल्ला तुम्ही स्वतःलाच का देत नाही? रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सांगावं की आता वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली आहे. वाढलेल्या ताकतीसह 2024 ची निवडणूक ते लढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घ्यावी.’