प्रतिनिधी.
डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज 500 च्या आसपास कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आरोग्य यंत्रणा, प्रशासन व्यवस्था याचा संपूर्ण बोजवारा उडालेला असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. खासगी रुग्णालयांकडूनही लुटालूट सुरु असून या सर्व गोष्टींवर पहिली कोरोना परिषद डोंबिवलीत बुधवारी पार पडली. यामध्ये 15 सूचनांचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून हा ठराव आयुक्तांना देण्यात येणार आहे. आयुक्तांना या ठरावाविषयी अंमलबजावणी करण्यास पुढील 14 दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्या कालावधीतही आयुक्त व पालिका प्रशासनास ठोस उपाययोजना आखता आल्या नाहीत तर आयुक्त हटाव मोहीम हाती घेतली जाणार असल्याचा एकमुखी निर्णय परिषदेत घेण्यात आला.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांच्यावतीने डोंबिवलीत बुधवारी पहिली कोरोना परिषद पार पडली. यापरिषदेला सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कल्याण डोंबिवलीत दररोज 500 च्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना शासकीय रुग्णालयात बेड न मिळणे, ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णवाहिका न मिळणे, खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात आलेले भरमसाठ बिल आदि अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यासोबतच लॉकडाऊन काळात अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून नागरिकांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत सर्व पक्ष व संघटनांनी एकत्र येवून कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याने या कोरोना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 15 सूचनांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्रभाग अधिकारी व नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन करणे, गर्दी टाळण्यासाठी व सामजिक अंतर राखण्यासाठी प्रत्येक प्रभागात दहा स्वयंसेवक नेमून त्यांच्या मार्फत नागरिकांना घरपोच सुविधा देणे, प्रत्येक प्रभागात मोफत रुग्णवाहिकांची सेवा देणे तसेच सक्षम रुग्णवाहिका यंत्रणा उभी करणे, कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच महपालिकेच्या संकेत स्थळावर या बाबत माहिती उपलब्ध करून देणे, कोरोना आजराने घाबरून रुग्ण दगावल्याची संख्या अधिक असल्याने मानसोपचारतज्ञांच्या देखील नेमणूक करण्यात यावी यांचा समावेश आहे. हा प्रस्ताव लवकरच आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. आयुक्तांना प्रस्ताव पाठविल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी त्यांना देण्यात येईल त्याही कालावधीत काहीही बदल न झाल्यास आयुक्त हटाव याविषयीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याचा एकमुखी निर्णय या परिषदेत घेण्यात आला.
यापरिषदेला भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण, मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील, नितीन पाटील, इरफान शेख, काळू कोमस्कर आदि उपस्थित होते.
प्रस्तावातील मागण्या कायद्याला धरुन आहेत. यासाठी पालकमंत्री यांनीच डोंबिवलीत यावे. पालकमंत्री आले की सर्व प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणाही डोंबिवलीत उपस्थित होतील. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल. यासाठी पुढील बैठकीला पालकमंत्र्यांना आवर्जुन बोलविण्यात येईल. ते नाही आल्यास आम्ही पुढील भूमिका ठरवू. असे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सागितले
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना सुरुवातीला प्रशासनही गोंधळलेले होते आमच्याचसारखे. त्यामुळे काही गोष्टी राहील्या असतील. आयुक्तांना काही सूचना करुनही त्याची अंमलबजावणी होत नाही. आरोग्य यंत्रणा, अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा वचक राहीलेला नाही. सातत्याने या गोष्टी घडीत असताना इतर महापालिकांस्तरावरील आयुक्तांची बदली करण्यात आल्यानंतर तेथील निकाल हा काही प्रमाणात सकारात्मक दिसून आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त बदलून येथील परिस्थिती बदलते का पाहीले पाहीजे. ही आशा बाळगण्यापेक्षा दुसरा काही पर्याय राहीलेला नाही. तसेही कल्याण डोंबिवलीवर प्रयोगच सुरु आहेत हाही प्रयोग करण्यास हरकत नाही. असे आमदार राजू पाटील यांनी सागितले