नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
उल्हासनगर/प्रतिनिधी – कल्याण पूर्वेत भाजप आणि शिंदे गट यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या वादाने मोठे हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या आहेत. आपण आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचं गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे. या गोळीबारात शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले आहेत.
कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा राजकीय राडा बघायला मिळतोय. हा राडा इतका भयानक आहे की, ज्याची आपण कधी कल्पना देखील करू शकणार नाही. चक्क पोलीस ठाण्यात गोळीबाराची घडना घडली आहे. विशेष म्हणजे हा गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडला आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आता शहरातील पोलीसही सतर्क झाले आहेत. या घटनेत शिंदे गटाचे दोन तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली. त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख महेश आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.
उल्हासनगर फायरिंग प्रकरणी गुन्हा दाखल
आमदार गणपत गायकवाड यांच्या सह तीन जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हिल लाईन पोलिसांनी फायरिंग व हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच बरोबर गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर ला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.