नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – गेल्या वर्षीचे अतिवृष्टीचे अनुदान यावर्षीचा पावसाळा संपला तरीही मिळेना म्हणून शेवटी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी अनोखे आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाजीनगर युवकचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली पैठण तहसील कार्यालयातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि संततधार पावसाने हातात तोंडाशी आलेली पिके पूर्णपणे नासली गेली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी सह सततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले होते. परंतु पैठण तालुक्यात मात्र एक वर्ष झाले तरी देखील या अनुदानास मान्यता मिळाली नव्हती. शेवटी ऑगस्ट महिन्यामध्ये संततधार चे अनुदान मंजूर झाले असताना देखील सप्टेंबर महिना उलटून जात असताना आणि यावर्षीचा देखील कोरडा दुष्काळ पाहता शेतकऱ्यांना मात्र अनुदानासाठी वाट पाहावी लागत आहे.
सदरील अनुदान त्वरित खात्यावर मिळावे यासाठी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन छेडले. या आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार सारंग चव्हाण आणि पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या आंदोलनाची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली.