प्रतिनिधी.
डोंबिवली – कल्याण-शीळ रोडवरील आणि डोंबिवली मधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यावरून शिवसेना आणि मनसेत चांगलाच वाद रंगला असून टोलेबाजी सुरू झाली आहे.
खड्ड्यांवरून मनसे आमदार राजू पाटील आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात टोलेबाजी सुरू झाली आहे. राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना उपरोधिक आवाहन केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनीही राजू पाटील यांना प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात येणार असल्यानं तातडीनं ठाण्यातले खड्डे बुजवण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सहज डोंबिवलीचाही फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण शीळ मार्गावरचे खड्डे बुजवले जातील, असं ट्विट राजू पाटील यांनी केलं होतं. त्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलंय. ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवरच फॉलोअप करणाऱ्या आमदारांनी ट्विटरच्या बाहेर येऊन सहज स्वतःच्या मतदारसंघात एक फेरफटका मारावा, जेणेकरून आपल्या मतदारसंघात कुठेकुठे खड्डे भरणीची कामं सुरू आहेत, ते त्यांना कळेल, असा टोला खासदार शिंदेंनी लगावलाय. शिवाय कल्याण शीळ मार्गावर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.यानंतर आमदार राजू पाटील यांनी थेट खासदार श्रीकांत शिंदेंच्या डोंबिवलीतल्या बंगल्याबाहेर पडलेले खड्डे दाखवून दिले.तसंच फेरफटका मारण्याची मला गरज नाही, कारण मी इथला स्थानिक आहे, पार्टटाईम नाही, असं म्हणत ठाण्याला राहणाऱ्या खासदार शिंदेंना त्यांनी पुन्हा टोला लगावला. शिवाय हा राजकारणाचा मुद्दा नसून लोकांचा त्रास कमी करण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, असं आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात सेना-मनसे खड्ड्यावरून राजकरण तापणार हे दिसून येत आहे. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली मधील रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे प्रशासन लक्ष देऊन चांगल्याप्रकारे खड्डे बुजवणार का हे पाहावे लागेल
खासदार श्रीकांत शिंदे पार्ट टाईम आहेत, असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी लगावला होता. त्यावर गेले ४ महिने फुल टाईम लोकांसाठी काम कोण करतंय आणि ट्विटरवर काम कोण करतंय, हे लोकांना माहीत आहे. तुम्ही निदान माझं बोलणं सिरियसली घेऊन घराबाहेर पडलात, रस्त्यावर उतरलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन, असा प्रतिटोला आता खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावला आहे.