कल्याण/ प्रतिनिधी– ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडीओबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली होती.त्यापाठोपाठ शिवसेनेने या वादात उडी घेतलीये .शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत हा गंभीर प्रकार असून सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यामुळे याप्रकरणी चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एक तरुण आमदार गणपत गायकवाड हे ईव्हीएम हॅक करून निवडुन आल्याचा दावा करतानाचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे .हे स्टिंग असल्याचा दावा देखील करण्यात आलाय .या व्हायरल व्हिडियो स्टिंगमध्ये दिसणारा तरुण हा आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची 40 लाखाची फसवणूक केल्या प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे .मे महिन्यातील हा व्हिडियो असून याबाबत आमदार गायकवाड यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत या व्हिडिओत दावा करणाऱ्या आशिष चौधरी आपल्या मूलाची 40 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटकेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र असून या व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे.
आता या प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली आहे. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे , आमदार गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समवेत पोलीस उपयुक्ताची भेट घेत त्यांना याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी लांडगे यांनी आतापर्यंत आमदारांनी मशीन मध्ये घोळ केल्याची शंका होती मात्र आता या क्लिप मुळे ते स्पष्ट झाल्याचा आरोप केला आहे. सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीन मधून चुकीचे काम केले जात असल्याची सर्व पक्षीय राजकारण्यांची ओरड सुरू आहे. ईव्हीएम मशीन मधील गोंधळामुळे चुकीचा निर्णय लागला आहे. मतदार आणि प्रतिस्पर्धी उमेद्वाराच्या डोळ्यात धूळफेक करत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा कायदेशीर निर्णय होणे गरजेचे आहे यासाठी आज पोलिस उपयुक्तांना निवेदन दिल्याचे सांगितले.
तर प्रतिस्पर्धी उमेदवार बोडारे यांनी ईव्हीएम मशीन हॅक करणे हा देशद्रोह आहे आणि चौधरी याने आपण पैशासाठी हे काम केल्याची कबुली दिली आहे. सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याने यातील दोषींवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपला लोकशाही वर विश्वास असून आपण याप्रकरणी पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून संबंधित यंत्रणा चौकशी करून न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे



