नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
कोकण/प्रतिनिधी – कोकण आठवले की डोळ्यासमोर येतो तो सुंदर, हिरवागार निसर्ग आणि त्याच बरोबर कोकणातील संस्कृती जी विविधतेने परिपूर्ण आहे. तसेच कोकण अर्थात परशुरामाची सुंदर भूमी. अनेक संस्कृती, अनेक परंपरा आणि अनेक गाव-राहाटी, सणासुदीचे माहेरघर कोकणला मानले जाते. कोकणातला महत्वाचा आणि पारंपारिक सण म्हणजे शिमगा. या शिमग्यातलं आकर्षण असतं ते देवाच्या पालखीचे. शिमग्याला म्हणजेच होळीला कोकणात पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा आहे. प्रत्येक गावात हा सण साजरा केला जातो. वेगवेगळ्या संस्कृती, परंपरेचे दर्शन कोकणातील प्रत्येक सणाला गावोगावी पाहावयास मिळते.
कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणात गावाच्या ग्रामदेवता शिमगोत्सवात प्रत्येकाच्या घरी जात असतात. गावातील ग्रामस्थ मनोभावे आपल्या ग्रामदेवतेचे स्वागत मोठ्या थाटात करतात. राजापूरच्या गंगेच्या भेटीला ग्रामदेवतेच्या पालख्या दाखल झाल्या आहेत. आजही कोकणात परंपरागत चालणाऱ्या रूढी ,परंपरेची जोपासना केली जाते. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. एकीकडे शिमगोत्सवाची धुम सुरू झाली आणि होळी च्या दिवशीच राजापूर येथील प्रति गंगेचे आगमन झाले. प्रतिवर्षी पारंपरिक पद्धतीने गंगा माईच्या दर्शनाला अनेक गावातील पालख्या गंगेच्या भेटीला येत असतात. अनेक गावातील देवदेवताच्या पालख्या वाजत गाजत गंगेच्या भेटीला पोचल्या आहेत. यावेळी लांजा तालुक्यातील रिंगणे, विलवडे, हसोळ, ओझर या गावातील पालखी दाखल झाल्या आहेत. या सर्व पालख्यांचे पूजन करण्यात आले. मोठ्या संख्येनेदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी यावेळी दर्शन घेतले.