नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
सातारा/प्रतिनिधी – लोकसभेच्या रणधुमाळीला आता वेग आला आहे. सार्वत्रिक निवडणुकीला एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, आगामी निवडणुकांमध्ये पक्षांच्या शक्यता बळकट करण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराला वेग दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी हजारो जनसमुदायाचे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी हुमगांव येथील हुमजाई देवीचे सपत्नीक दर्शन घेतले.
भव्य असे हे शक्तिप्रदर्शन साताऱ्यातील गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत होते. यावेळेस राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख खा.शरद पवार हे स्वतः हजर होते तर त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शशिकांत शिंदेंना ताकत देण्यासाठी उपस्थिती लावली होती. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. शशिकांत शिंदे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.