नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
भिवंडी/प्रतिनिधी – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांनी आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली असून काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या संभाव्य लोकसभा मतदार संघांच्या यादीत भिवंडी लोकसभेवर पवारांनी दावा केला आहे.विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे राष्ट्रवादीचे २०२४ चे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या भिवंडीत रंगली आहे.
सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभ प्रसंगी रविवारी शरद पवार भिवंडीत आले होते.पवारांनी बाळ्या मामा यांच्या परिवारासह नव दांपत्यांना शुभाशीर्वाद दिले.त्यानंतर शरद पवार व बाळ्या मामा यांच्यात बंद दाराआड काही वेळ चर्चा झाली.या चर्चे दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.बंद दाराआड झालेल्या या चर्चेत भिवंडी लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती बाळ्या मामा यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे.राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दहा लोकसभांच्या यादीत भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीकडे येणार असल्याने राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हेच असणार असल्याची चर्चा भिवंडी लोकसभा मतदार संघात रंगली आहे.विशेष म्हणजे या स्वागत समारंभासाठी पवारांनंतर काही वेळाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हजेरी लावली.त्यामुळे पवार व बाळ्या मामा यांच्यातील बंद दाराआड झालेल्या गुप्त चर्चेबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या ठाणे येथील जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश म्हात्रे यांचा उल्लेख, आमचा बाळ्या मामा असा केला होता.तेव्हापासून बाळ्या मामा राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दुसरीकडे भिवंडी लोकसभा नेहमीच काँग्रेसकडे राहिले आहे.मात्र सध्या भिवंडी लोकसभेत काँग्रेस पक्ष कमजोर असून फुटीरधोरणामुळे काँग्रेसने भिवंडी महापालिका देखील गमावली आहे.तर भिवंडी लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे अस्तित्व नाही.हा मतदारसंघ मुस्लिमबहुल मतदार संघ असल्याने केवळ मुस्लिम मतदारांच्या गणतीवरच काँग्रेस नेहमी भिवंडी लोकसभा मतदार संघावर आपला दावा करत आली आहे.मात्र २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भिवंडीतून सतत अपयश येत असल्याने भिवंडी लोकसभेवर आता राष्ट्रवादीने दावा केला आहे.विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट देखील भिवंडी लोकसभेसाठी शरद पवारांसोबत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भिवंडी लोकसभेसाठी आपली मोर्चेबांधणी सुरु केली असून शरद पवारांनी खुद्द बाळ्या मामा यांना स्वागत समारंभानिमित्ताने भेट दिल्याने राष्ट्रवादीचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार सुरेश म्हात्रे असल्याची चर्चा भिवंडी लोकसभेत रंगली आहे.