नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मी गरीब काँग्रेसवाल्यांना वाटाघाटीच्या वेळेस सांगत होतो की, आपला सँडविच झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. एका बाजूला राष्ट्रवादी ( शरद पवार) आणि दुसऱ्या बाजूला उध्दव ठाकरे यांची शिवसेना हे आपले सँडविच केल्याशिवाय राहणार नाहीत. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार दौलतखान यांच्या प्रचार सभेत व्यक्त केले आहे.
मी काँग्रेसवाल्यांना आवाहन करतो की, आपण वंचितचे उमेदवार दौलत खान यांना मदत करा. विधानसभेत आपण एकत्र लढू शकतो. प्रकाश आंबेडकर म्हणाले “मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदार संघात फुले-शाहू-आंबेडकरांना आणि मानवतेला मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी शंभर टक्के मतदान करावे असे त्यांना आवाहन आहे आणि त्यांनी ए.सी. या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे.”
“काँग्रेसवाले म्हणतात की, शिवसेना (ठाकरे) चा प्रचार करून काय उपयोग? ते काय आपल्यासोबत राहणार नाहीत ते उद्या भाजप सोबत जातील. नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की, उध्दव ठाकरे यांना ज्यावेळी मदत लागेल त्यावेळी मी त्यांना मदत द्यायला तयार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे झाले आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही.”
“मुस्लिम समाज म्हणत आहे की, २१ राज्यांत एकही उमेदवार आमचा दिलेला नाही. त्यांचे म्हणणे बरोबर आहे. कारण, काँग्रेसवाल्यांनी उमेदवारी दिली नाही, राष्ट्रवादीवाल्यांनी दिली नाही आणि उध्दव ठाकरे तर देणारच नाही. मुस्लिम समाजाचा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीने उभा केला आहे, हे मुस्लीम समाजाने लक्षात घेतले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.