महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ येथे सात दुकाने जळून खाक

सोलापूर/अशोक कांबळे – शुक्रवारी रात्री मोहोळ शहरातील सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून सात दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत.आग शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लागली.यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मोहोळ शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांच्या जीव रक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्यांचा अभाव मोहोळ नगर परिषदेकडे असून शहरात आगीने मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी नगर परिषद घेईल का ? शहरात आगीने जीवितहानी झाल्यानंतरच नगर परिषद अग्निशामक दलाच्या गाड्या घेणार का असा सवाल नागरिक करीत आहेत.मोहोळ नगर परिषदेकडे अग्निशामक दलाच्या गाड्या असत्या तर शुक्रवारी संध्याकाळी लागलेली आग आटोक्यात आणून कमी प्रमाणात नुकसान झाले असते.नगर परिषदेकडे वारंवार मागणी करून ही अग्निशामक दलाच्या गाड्या घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.भविष्यात आगीने मोहोळ शहरात मोठी जिवीतहानी झाल्यास त्याला नगर परिषद जबाबदार असेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मोहोळ येथील राष्ट्रीय महामार्गावरील रविराज शॉपिंग सेंटर मध्ये असणाऱ्या दुकानांना 2 एप्रिल रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली.या आगीमध्ये सात दुकाने जळून भस्मसात झाली.दरम्यान लोकनेते साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी वेळेत दाखल होऊन ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
मोहोळ शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असून या रस्त्यावर अनेकदा चालत्या वाहनांनी पेट घेतला आहे.काही महिन्यांपूर्वी मोहोळ शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर,कुरुल रस्त्यावर अचानक चालत्या कंटेनरने पेट घेतला होता.यामध्ये लोकनेते कारखाना व लोकमंगल कारखाना येथून अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यन्त कंटनेर जळून खाक झाला होता.सुदैवाने ही घटना शहरापासून काही अंतरावर घडल्याने यामध्ये जास्त प्रमाणात नुकसान झाले नाही.यावेळी काही तासासाठी या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
मोहोळ शहराची लोकसंख्या वाढल्याने ग्रामपंचयातीचे नगर परिषदेमध्ये रूपांतर होऊन पाच वर्षे उलटली आहेत.काही महिन्यात नगर परिषद दुसऱ्या पंच वार्षिक निवडणुकीला सामोरे जाणार आहे.मोहोळ मधील जनता वीज,पाण्याच्या समस्येला सामोरे जात असताना मोहोळ शहरात वारंवार लागणाऱ्या आगी विझविण्यासाठी आवश्यक असलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्या नगर परिषदेकडे नाहीत.त्यामुळे मोहोळ शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मोहोळ शहरात आग लागल्यास अनगर येथील लोकनेते साखर कारखाना,लोकमंगल साखर कारखाना येथील अग्निशामक गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण केले जाते.मोहोळ शहरापासून लोकनेते कारखाना सुमारे आठ किलोमीटर आहे तर लोकमंगल कारखाना सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.मोहोळ शहरात लागलेली आग विझविण्यासाठी गाड्या येईपर्यंत आगीत मोठया प्रमाणावर नुकसान होते.मोहोळ शहरात अद्यापपर्यंत आगीने जीवितहानी झालेली नाही पण वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे.शहरात आगीने जास्त जीवितहानी होण्याची नगर परिषद वाट पहात आहे का ? जास्त जीवितहानी झाल्यानंतरच नगर परिषद अग्निशामक दलाच्या गाड्या घेणार का असा सवाल मोहोळ मधील नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×