नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पुणे येथे नुकत्याच झालेल्या पॅरा (दिव्यांग) राज्यस्तरीय योगा स्पर्धेत उल्हासनगर येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत ३ पदके पटकावत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरवली. तर पार्थ चौधरी याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोशिएशन व महाराष्ट्र पॅरा योगासन स्पोर्टस् समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली राज्यस्तरीय पॅरा (दिव्यांग) योगासन ही स्पर्धा राज भवन गणेशखिंड रोड, पुणे पार पडली.
पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उल्हासनगर येथील ११ खेळाडू सहभागी झाले होते त्यामधील ३ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. राज्यस्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये पार्थ चौधरी, खुशी पाल, पल्लवी मोकाशी, रिद्धी शिरोखे, अर्पण भुसारे, वेदिका जबडे, गार्गी राणे, ऑगस्टिन शेंडे, वेदांती घरत, करण घोलप, गणेश पिसे यांचा समावेश आहे. तर दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पल्लवी मोकाशी, ऑगस्टिन शेंडे, अर्पण भुसारी यांची निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना ठाणे जिल्हा योगा प्रशिक्षिका करुणा लेदे यांचे मार्गदर्शन लाभले.