नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि लूट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. विशेषतः रेल्वे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. चोरी करण्यासाठी चोरटे कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. चोरी आणि चैन स्नेचिंगसारख्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चोरटयांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यानंतर ही चोऱ्यांचे सत्र सुरूच आहेत. चैन स्नेचिंगची घटना पुन्हा कल्याण शहरातील वासिंद रेल्वे स्टेशन परिसरात घडली.
कल्याणातील वासिंद रेल्वे स्थानकावर लोकल थांबली असता महिला प्रवाशाच्या गळ्यातील महागडी चैन हिसकावून एका चोरट्याने तेथून पळ काढला. या प्रकरणात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती. त्याप्रमाणे पोलिस या चोरट्याला अनेक दिवसांपासून शोधत होते. या घटनेला उलटून अनेक दिवस झाल्यानंतर अखेर पोलिसांना चैन स्नेचरला शोधण्यात यश मिळाले आहे.
सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण रेल्वे पोलिसांनी या चोरट्याला पंधरा दिवसानंतर अटक केली आहे. दिनेश धुमाळ असे चोरट्याचे नाव असून तो टिटवाळ्याचा रहिवासी आहे. दिनेश हा मूर्तीकार आहे. ज्या हाताने तो सुंदर, देखण्या मूर्ती तयार करत असे त्याच हातांनी तो चोरी करायचा. त्याच्या विरोधात यापूर्वीही चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे.