नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – आगरी बोलीभाषा,आगरी साहित्य जतन व्हावे तिचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी प्रत्येक तालुक्या आगरी ग्रंथालय उभे राहून त्याद्वारे वाचन-लेखन संस्कृती उभी रहावी यासाठी युवा साहित्यिक सर्वेश तरे, गीतकार-संगीतकार दया नाईक आणि चित्रकार, आगरी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील, साहित्यिक प्रकाश पाटील यांनी आगरी ग्रंथालय चळवळीची सुरवात केली. साहित्य संमेलनात लोकशाहीर शनीकुमार शेलार यांच्या आठवणींचा जागर करण्यात आला. ग्रंथालय चळवळीद्वारे भिवंडी येथील दिंडीगड येथे पावसाळी आगरी साहित्य संमेलन जल्लोषात झाले.
या आगरी साहित्य संमेलनाची सुरवातच लहान मुलींनी पारंपारिक आगरी पेहराव करुन मासे ठेवण्याच्या टोपलीत आगरी बोलीतील पुस्तके ठेऊन ती डोक्यावर घेऊन ग्रंथदिंडी काढण्यात आली अन संमेलनाचे प्रास्ताविक संपुर्णतः आगरी भाषा अन तिच्या लहेजात साहित्यिक प्रकाश पाटील यांनी केले. त्यांनंतर पहिल्या सत्रात लोकशाहीर स्व.शाहीर शनीकुमार शेलार यांच्या आठवणींचा जागर गायक बिगबॉस फेम दादुस संतोष चौधरी, जगदीश पाटील, किसन फुलोर, संदेश भोईर, संमेलनाध्यक्ष रामनाथ म्हात्रे, मयुरेश कोटकर, विजय नाईक, बाळु म्हात्रे यांनी केला.
नुकतच मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेत द्वितीय वर्षाला ‘आगरी’ भाषेचा विषय अभ्यासा साठी सुरु करण्यात आला आहे. खास करुन ते विद्यार्थी साहित्यसंमेलनात सामील झाले होते. त्यांच्या सोबत बीएनएन महाविद्यालयाचे मराठी वागमय मंडळाचे डोंगरदिवे सर, ठाणा कॉलेजचे प्रा. रुपेश महाडिक यांनी विद्यार्थी रसिकांसमवेत संवाद साधला ज्याचे सुत्रसंचालन सर्वेश तरे यांनी केले.
या आगरी साहित्य संमेलनात डॉ.शोभा पाटील यांनी धवलागीत,पार्वती पाटील यांनी मरणोत्तर आगरी विधी करणारी डाकीगीत सोबत आगरी कविसंमेलनही झाले ज्याचे अध्यक्षपद प.सा म्हात्रे यांनी भुषवीले. सोबतच कवयत्री निर्मला पाटील ह्यांनी ह्या कविसमेंलनाचे सुत्रसंचालन केले. ज्यात विविध तालुक्यातील आगरी कवींनी सहभाग घेतला. सोबत नाटककार प्रविण पाटील अन अभिनेत्री प्रिती घरत यांनी भिवंडी येथील टोरेंट कंपनीच्या वीजबीलाने नागरिक कसे त्रासले आहेत हे विनोदातुन आगरी नाटिकेत मांडले.
आगरी ग्रंथालयाच्या वतीने लोककलाकार शाहीर स्व.शनी कुमार यांना मरणोत्तर ‘आगरी रत्न पुरस्कार’ हा त्यांच्या परिवारास देण्यात आला. रसिकांनी हे साहित्य संमेलन नसुन लघू आगरी महोत्सव आहे अशी दाद देखील दिली असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष मोरेश्वर पाटील यांनी सांगीतले. दरम्यान या संमेलनाला माजी आमदार रुपेश म्हात्रे, कल्याण भाजपा महिलाअघ्यक्ष ज्योती भोईर, मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी, अॅड. भारद्वाज चौधरी आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.