नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी टिटवाळा, धारावी आणि विक्रोळी येथे आयोजित तीन वेगवेगळ्या रक्तदान शिबिरांमध्ये एकंदर 414 युनिट रक्तदान केले गेले.संत निरंकारी मंडळाच्या डोंबिवली झोन अंतर्गत टिटवाळा येथील विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजित रक्तदान शिविरात 82 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले ज्यामध्ये 72 पुरुष तर 10 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. जे.जे.महानगर रक्तपेढी मार्फत या शिबिरात रक्त संकलन करण्यात आले.
संत निरंकारी मंडळाच्या कल्याण विभागाचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे यांच्या व्यतिरिक्त अनेक स्थानिक प्रबंधकगण आणि सेवादल अधिकारी उपस्थित होते. मांडा, टिटवाळा, मोहने, आंबिवली, अटाळी तसेच आसपासच्या भागातील निरंकारी भक्तांनी या शिबिरामध्ये भाग घेतला. मंडळाचे स्थानिक मुखी खंडू धादवड यांनी सेवादल सदस्यांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले.
ट्रान्झिट कँप म्युनिसिपल स्कूल, धारावी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 237 रक्तदात्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या शिबिरात निरंकारी भक्तगणां व्यतिरिक्त समाजातील अन्य सज्जनांनीही भाग घेतला. संत निरंकारी रक्तपेढीने या शिबिरामध्ये रक्त संकलन केले. मुख्यत्वेकरुन धारावी परिसरातील रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे बांदा (उ.प्र.) येथील क्षेत्रीय प्रभारी डॉ.दर्शन सिंह यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अनेक प्रबंधकगण व सेवादल अधिकारी उपस्थित होते. या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिति अध्यक्ष रामदास कांबळे, शिवसेना शाखाप्रमुख सुरेश जाधव व मुत्थूपटन आदिंचा समावेश होता. मान्यवरांनी मिशनच्या मानवतावादी कार्याची प्रशंसा केली. मंडळाचे स्थानिक मुखी राजेंद्र कदम यांनी स्थानिक सेवादल युनिटच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन केले.
या श्रृंखले अंतर्गत तिसरे रक्तदान शिबिर मंडळाच्या टागोर नगर व आयआयटी सूर्या नगर या शाखांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. डॉ.आंबेडकर भवन, अभय शिक्षण केन्द्र, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथे आयोजित केलेल्या या शिबिरात 95 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. या ठिकाणी संत निरंकारी रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले. विक्रोळीतील टागोर नगर, कन्नमवार नगर तसेच आयआयटी सूर्या नगर आदी भागांतील रक्तदात्यांनी या शिबिरात भाग घेतला.
विक्रोळी येथील शिबिराचे उद्घाटन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक प्रकाश जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिराला नवभारतचे संपादक ब्रिजमोहन पांडे तसेच उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सदिच्छा भेट दिली. स्थानिक ब्रांच मुखी विजय परब यांनी सेवादल युनिटच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले.