नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले तसेच श्रीकांत शिंदे यांची चौकशी करा अशी मागणीही संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत चालले आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली.
ठाण्यात पत्रकारांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले “ज्या प्रकारे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे ते खूप हास्यास्पद आहे. जे पत्राचाळच्या घोटाळ्यात जेलमध्ये गेले ते पत्र लिहित आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून जी चांगली कामे होत आहेत ते पत्रामधून लिहिण्याचे काम त्यांनी केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे, यावरुन त्यांचा नरेंद्र मोदींवरील विश्वास वाढल्याचे दिसते आहे. ज्यांनी खिचडीमध्ये घोटाळा केला, जे पत्राचाळमध्ये जेलमध्ये गेले. खिचडी घोट्याळ्याचे ज्यांचा कुटुंबातील लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत त्यातून त्यांनी कोणाला मदत केली आहे का ? जे पत्र्याच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांना पत्र लिहू नये. महाराष्ट्र व देश बघतो आहे की संजय राऊत यांचे मानसिक संतुलन दिवसेंदिवस बिघडत आहे त्यांनी चांगले हॉस्पिटल बघून उपचार करुन घ्यावेत.” अशी टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी संजय राऊत यांच्यावर केली.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच नेते मंडळी विरोधी पक्षाने केलेल्या घोटाळ्यांची यादी जनतेला वाचून दाखवतात. पण पुढे निवडणुका संपल्या की घोटाळा ,घोटाळा करणाराआणि घोटाळ्याचे आरोप करणारा हे सगळे गायब होतात. मग सामान्य जनतेच्या मनात हा विचार येतो की नक्की विश्वास कुणावर ठेवायचा,आणि का ?