नेशन न्यूज मराठी टिम.
नांदेड/प्रतिनिधी– भारत मातेची सेवा करण्यासाठी त्याग, कष्ट, संयम या गोष्टीची खूप गरज असते. यासाठी लष्करात भरती होऊन भारतात कुठल्याही सीमेवर जाण्याची तयारी घर, कुटुंब, संसार यापासून हजारो मैल दूर जाऊन देशाच्या सुरक्षिततेसाठी, नागरिकांच्या संरक्षणासाठी सैनिक जीवाची बाजी लावत असतात. पण जवळून जर यांचे जीवन जाणून घेतले तर रम्य आणि सुरस असण्याऐवजी अनेक चित्तथरारक अनुभवांची, जीवावर बेतणाऱ्या संकटांनी भरलेले असते.
सैन्यातील शौर्याच्या कहाण्या आपण नेहमी ऐकतो. त्यांची बहादुरी, त्याग व शौर्य यांनी भरलेले सर्वोच्च बलिदान गौरवास्पद व उल्लेखनीय पराक्रमाचा सगळ्यांना अभिमान वाटतो. परंतु या सैनिकांच्या मागेसुद्धा ठामपणे आणखी एक शक्ती उभे असते. मग ती आई, पत्नी किंवा मुलगी असू शकते. आज अशाच एका कर्तुत्वान मुलगी ,सासू व आईची भूमिका एकाच व्यक्तीने साकारणाऱ्या सैनिकामागील खऱ्या शक्तीची माहिती जाणून घेणार आहोत. पांडुरना गावातील रहिवासी असणाऱ्या साबेरा सुलतान दस्तगीर पठाण (जहागीरदार) यांना तीन पिढीचे सैनिक वारसा लाभला आहे. त्यामध्ये कर्तुत्वान मुलीची भूमिका निभावत असताना श्रीमती साबेरा सुलतान यांचे वडील श्री तालीब हुसेन हे भारतीय सेनेत कार्यरत होते आणि श्रीमती साबेरा सुलतान अवघ्या 23 दिवसांच्या असताना सन 1945 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या युद्धात ते मोहिमेवर जे गेले ते परत घरी परतलेच नाही. त्या लहानग्या बालकाने आपल्या वडिलांना पाहिले देखील नाही आणि त्यांच्यावरील वडिलांचे छत्र कायमचेच हरवले.
मराठवाडा विभागात विशेष करून मुस्लिम समाजात भारतीय सेनेत जाण्यासाठी कोणी धजावत नव्हते, तेव्हा श्रीमती साबेरा सुलतान यांनी स्वकीयांचा विरोध पत्करून आपली एकुलत्या एक मुलीचा विवाह भारतीय सैन्याच्या मॅकानाईज्ड इन्फंट्री मध्ये कार्यरत असणाऱ्या श्री शेरखान पठाण यांच्याशी केला. सैनिकांना निर्धास्तपणे देशाचे संरक्षण करता यावे म्हणून त्यांचे घर, कुटुंब यांच्यावर मायेची पाखर घालत, कणखरपणे सांभाळून सैनिकामागील खरी शक्ती सैनिक आईचे अप्रतिम कार्य त्यांनी केले. सैनिक पुत्री, त्यानंतर सैनिक मातेची भूमिका निभावण्यासाठी त्यांचे पुत्र श्री हयून पठाण यांनाही भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी लहानपणापासूनच व्यायाम, खानपान व आपला इतिहासाची जाण करून त्यांनाही भारतीय सेनेच्या गौरवशाली परंपरा असलेल्या इंजिनिअर रेजिमेंट मध्ये भरती केले. आपल्या रगा-रगात सैनिकी रक्त सामील असलेले श्री ह्युन पठाण यांनी ही भारतीय सेनेत 17 वर्षे गौरवशाली, साहसी, पराक्रमी सेवा पूर्ण ज्या मध्ये कारगिल युद्ध, ऑपरेशन पराक्रम अशा मोहिमेत पराक्रम गाजवून ते सेवानिवृत्त झाले. देशसेवेसोबत समाजसेवा करण्याची जिद्द त्यांना शांत बसून देत नव्हती. त्यातच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि प्रथम तलाठीपदी रुजू होऊन आता मंडळ अधिकारी ही पदोन्नती घेऊन समाजसेवा करण्यासाठी त्यांच्या सैनिकमातेने आपल्या पुत्राला प्रोत्साहित केले.
आपली सैनिकी सेवेची गौरवशाली परंपरा या ठिकाणीही श्रीमती साबेरा सुलताना यांनी खंडित होऊ न देता त्यांचे नातू श्री अय्याज पठाण हे उच्चशिक्षित असून त्यांना भारतीय सेनेत जाण्यासाठी प्रेरित केले व ते सध्या लेह येथील बर्फाळ क्षेत्रात देशसेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे श्रीमती साबेरा सुलतान यांनी आपली डॉक्टर नातीचा विवाह सैनिकशी केले व त्यांच्या दोन्ही मुलांच्या विवाहासाठी सुना सुद्धा भारतीय सेनेतील निवृत्त अधिकारी यांच्या कन्या निवडल्या आहेत.
आदिमाया तू आदिशक्ती तू, सकल जनांची जननी तू
हिरकणी गत गाणं कोकिळा तू, अंतराळातही झेपावलीस तू
अशा प्रकारे श्रीमती साबेरा सुलताना गुलाम दस्तगीर पठाण यांनी आपले स्वतःच्या आयुष्यासह आपले संपूर्ण कुटुंबच देशसेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या या खडतर आगळावेगळा जीवनप्रवास समाजाला एक आदर्श प्रेरणा देऊन जाईल यात शंका नाही. त्यांच्या या गौरवास्पद कार्यासाठी आज त्यांना ‘त्यागमूर्ती आदर्श माता’ पुरस्काराने शिक्षण संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.