नेशन न्युज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – महिलांना रेल्वेतून सुरक्षित आणि निर्विघ्न प्रवास करण्याच्या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) 25 सदस्यीय संघाने आज दिल्ली हाफ मॅरेथॉन 2023 मध्ये भाग घेतला. भारतीय रेल्वे मार्गावर महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने रेल्वे पोलिस दलाच्या विविध उपक्रमांबद्दल जनजागृती करणे हा या दौडी मागचा मुख्य उद्देश होता. यात विशेषत्वाने “मेरी सहेली” उपक्रमावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
महिलांचे सक्षमीकरण हा भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनाचा एक तडजोड न करता येण्यासारखा भाग आहे. आपल्या पंतप्रधानांनी कल्पिलेला समृद्ध भारत साध्य करणे हे सार्वजनिक ठिकाणी, विशेषत: व्यापक सार्वजनिक वाहतूक प्रणालीमध्ये महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर अवलंबून आहे. रेल्वे हे सार्वजनिक वाहतुकीचे प्राथमिक साधन असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले रेल्वे संरक्षण दल (RPF) महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तत्परतेने काम करत आहे. “मेरी सहेली” उपक्रमातील सुरक्षा दल चमू भारतातील लांबवर पसरलेल्या रेल्वे मार्गाच्या जाळ्यावर कार्यरत असून, लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून एकट्याने प्रवास करणार्या असंख्य महिलांना सहाय्य आणि सुरक्षा प्रदान करत आहेत. रेल्वे आणि रेल्वे स्थानक परिसरात महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे पोलिस दलाच्या महिला कर्मचारी त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीने काम करत आहेत.
2023 मध्ये, रेल्वे पोलिस दलाच्या जवानांनी उल्लेखनीय कामगिरी करत, धावत्या गाड्यांमधील धोकादायक परिस्थितीतून 862 महिलांची सुटका केली. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत, रेल्वे पोलिस दलाने स्थानकावर आणि रेल्वेमध्ये सोबतीला कोणीही नसल्याने धोक्यात असणाऱ्या 2,898 मुलींची सुटका केली आणि त्यांना चुकीच्या लोकांच्या तावडीत सापडण्यापासून रोखले. शिवाय, रेल्वे पोलिस दलाने 51 अल्पवयीन मुली आणि 6 महिलांना मानवी तस्करांच्या तावडीतून वाचवले आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रसूती झालेल्या 130 मातांच्या प्रसूतीसाठी रेल्वे पोलिस दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गोपनीयतेचा आणि प्रतिष्ठेचा अत्यंत आदर राखून मदत केली आहे. रेल्वे पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांनी 1,85,000 हून अधिक हेल्पलाइन कॉलना प्रतिसाद देत प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरेने काम केले. ही मदत विशेष रूपाने निराधार, आजारी, वृद्ध आणि दिव्यांग यासारख्या व्यक्ती आणि संकटात असलेल्या महिलांना पुरवली जाते.