नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – महाराष्ट्रभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. कारण २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज्यांचे राजकीय भविष्य पणाला लागले आहे. जळगावमधील राजकारण यावेळी भलतच तापलय. कारण ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून तसेच विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना महायुतीकडुन रावेर मतदार संघातून उमेदवारी मिळाली आणि दुसरीकडे त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आहेत. त्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी असल्याचे चित्र खडसे कुटुंबात आहे.
आज १३ मे रोजी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड येथील मतदार संघाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज मतदान केले. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी पतीसह मतदानाचा हक्क बजावला. रोहिणी खडसे या मतदान केंद्रावर येत असताना त्या ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांची गाडी उभी होती रोहिणी खडसे यांनी रक्षा खडसे यांना हस्तांदोलन करत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.