प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प असणाऱ्या ‘रिंगरोड’चे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल असा अंदाज केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वर्तवला आहे. केडीएमसी आयुक्तांसह शहर अभियंता, एमएमआरडीए अधिकारी, नगररचना विभाग अधिकारी आदींनी रिंगरोडच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला.
रिंगरोडच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्पा क्रमांक 4 ते 7 ची पाहणी करण्यात आली. तसेच इथल्या जमिन भूसंपादनाच्या अडचणीही पालिका आयुक्तांनी जाणून घेतल्या. रिंगरोडची समाधानकारक प्रगती झालेली असून येणाऱ्या अडचणी सोडवण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. दुर्गाडी ते टिटवाळा मार्गदरम्यान आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची अडचण असली तरी त्याला बायपास करून रिंगरोडची कनेक्टिव्हिटी तयार करण्यात आली आहे. येत्या एप्रिलपासून प्रत्येक टप्पा केडीएमसीच्या ताब्यात देण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असून पावसाळ्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील वडवली पुलाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून 20 जानेवारीपर्यंत तर कोपर पूल 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच पत्रीपुलाला जोडणाऱ्या 90 फूटी जोडरस्त्याचे कामही वेगाने सुरू असून दुर्गाडी पूलाच्या 3 लेन पावसाळ्यापूर्वी ताब्यात देण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.