नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – सेंचुरी रेयॉन कंपनीतील कामगारांना यंदा प्रथमच विक्रमी बोनस मिळणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने झालेल्या करारान्वये यंदा कामगारांना २१ हजार रुपये बोनस व ५१०० रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. या कराराबद्दल `सेंचुरी रेयॉन वर्कर्स युनियन’चे अध्यक्ष रवींद्र कोनकर, महामंत्री रमेश यादव यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
`सेंचुरी रेयॉन वर्कर्स युनियन’च्या प्रमुख सल्लागारपदी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली होती. त्यानंतर प्रथमच कामगारांना भरघोस बोनस मिळाला आहे. यापूर्वी कंपनीतील कामगारांना २०१६ ते २०१८ या कालावधीत १६ हजार २०० रुपये, २०१९ ते २०२१ पर्यंत १८ हजार १०० रुपये बोनस मिळाला होता. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनचे अध्यक्ष कोनकर व महामंत्री यादव यांनी कंपनीचे युनिट हेड अपूर्व गुप्ता, उपाध्यक्ष (मनुष्यबळ) श्रीकांत गोरे यांच्यासह व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींबरोबर सविस्तर चर्चा केली. कामगारांना बोनसच्या रकमेत वाढ करण्याबरोबरच बक्षीस देण्याची मागणी केली होती. युनियनच्या आग्रहानंतर बोनसची रक्कम २१ हजार व ५ हजार १०० रुपये बक्षीस देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले. या करारामुळे कामगारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
सेंचुरी रेयॉनमधील कामगारांना मिळालेला बोनस हा कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे. याबद्दल सर्व कामगारांचे अभिनंदन करीत असून, व्यवस्थापनाचे आभारी आहोत. यापुढील काळात कामगार व व्यवस्थापनाने एकत्रित काम करून कंपनीला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी कार्य करावे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.