सोलापूर/अशोक कांबळे – एमपीएससी च्या प्रलंबित परीक्षा घेण्यात याव्यात. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी.नवीन जाहिरातीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात यावे यासह एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युगंधर संघटनेच्या वतीने सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर लांबोटी ता.मोहोळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला केले व रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला.यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी मागण्याचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक माने यांनी स्वीकारले.या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या दोन वर्षापासून एमपीएससी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा वारंवार रद्द करण्यात येत आहे.नवीन जागांची जाहिरात प्रसिद्ध न केल्यामुळे विद्यार्थ्यांना तयारी करता येत नाही.गेली दोन वर्ष परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वयाच्या पात्रता अटीत वाढ करण्यात यावी. जेणेकरून एमपीएससीचे विद्यार्थी अधिकारी होण्यापासून वंचित राहू नये. तसेच जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या नियुक्त्या देखील महाराष्ट्र सरकारने प्रलंबित ठेवल्या आहेत.या सर्व गोष्टीला महाराष्ट्र शासनाने तितकंसं गांभीर्याने न घेतल्यामुळे एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये स्वप्नील लोणकर नावाच्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागली.सरकारच्या या धोरणामुळे लाखो विद्यार्थ्यांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे.त्यामुळे शासनाने या संदर्भातली आपली भूमिका अधिवेशनात स्पष्ट करावी.
या आंदोलनात युगंधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल गुंड,अनिल पाटील,गणेश मोरे मयूर जावळे,युवराज पाटील,बाबा डोईफोडे, प्रमोद आठवले सोमनाथ देवकाते,अभिजीत नेटके आदी सहभागी झाले होते.यावेळी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.