नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – कडक उन्हामुळे तापमानाचा पारा वाढल्याने जिवाची काहिली झाली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात याचा सर्वात मोठा परिणाम झालेला दिसत आहे. अनेक जिल्ह्यात दुष्काळाची समस्या निर्माण झाल्यामुळे यात शेतकऱ्यांची फरफट होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे मुळा डावा कालव्यातून शेतीच्या आवर्तनासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना तसेच शेतकरी आक्रमक झाले. यावेळी त्यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्ता रोको आंदोलन केले. शेतीतील पिके जगण्यासाठी तसेच गोधन चारा वाचवण्यासाठी सरकारने ताबडतोब मुळा डावा कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
रस्ता रोको केल्यानंतर अचानक शेतकऱ्यांनी अर्ध नग्न होऊन आंदोलन सुरू केले. “पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं” अशा घोषणा आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. शेतातील बोअरवेल तसेच पाण्याचे तळे आटल्यामुळे पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रशासनाला यासंबंधी वारंवार आवेदन करून देखील त्याची दाखल घेण्यात नाही आली. असे मत शेतकऱ्यांनी यावेळेस व्यक्त केले. रानातली पीकं पाण्याअभावी जळून गेल्यामुळे गुरांना घालण्यास चारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. यावेळी आंदोलयांकर्त्यांचा रोष पाहून नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले.