नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – पावसाळा अंतिम टप्प्यात असला तरी बीड जिल्ह्यामध्ये अजूनही पुरता पाऊस झालेला नाही. परिणामी जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पावसाअभावी नुकसान होत आहे.तरी मात्र शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात बीडच्या गेवराई मध्ये ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
२०२२-२३ मधील नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना मंजूर करावे, गेवराई विधानसभा मतदारसंघ दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा, गुरांच्या छावण्या सुरू करण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी राज्यमंत्री तथा ठाकरे गटाचे नेते बदामराव पंडित यांनी केली. तर सरकारचं लक्ष शेतकऱ्यांकडे नसून पक्ष फोडाफोडीत असल्याची टीका ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी केली आहे.