नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – नववर्ष दिनी अर्थातच गुढीपाडव्याच्या शुभ दिनी महानगरपालिकेने आपल्या स्वच्छता रथासह आणि घनकचरा विभागाच्या कर्मचारी वर्गांसह कल्याण व डोंबिवली येथील शोभायात्रेमध्ये आपला सक्रिय सहभाग घेतला. या शोभायात्रेत घनकचरा ,कचरा संकलन ,विलगीकरण, प्लास्टिक बंदी याबाबत जनजागृती करणारी संगीत धून वाजविणाऱ्या सीएनजी डंपर रुपी स्वच्छता रथाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सकाळी शोभायात्रेसमयी केले.
महापालिकेचा हा स्वच्छता रथ तसेच शोभायात्रेत निर्माण होणारा कचरा संकलित करणारी घंटागाडी यांचा सहभाग कल्याण व डोंबिवली या दोन्ही नगरीतील शोभायात्रेत होता तसेच प्लास्टिक बंदी, स्वच्छता याबाबत घंटागाडीवर लावलेले जनजागृतीपर बॅनर्स सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
पर्यावरण दक्षता मंडळाच्या रूपाली शाईवाले, निर्मल युथ फाऊंडेशनच्या अक्षता आवटी आणि गगन शिंदे फाउंडेशन या तिन्ही एनजीओजच्या सुमारे 100 स्वयंसेवकांनी शोभायात्रेत निर्माण होणारा कचरा उचलून घंटागाडी मध्ये संकलित करणे बाबत महापालिकेस सहकार्य केले.
महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी देखील कल्याण व डोंबिवली या दोन्ही नगरीतील शोभायात्रेत अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. या समयी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, प्रभागांचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत, भरत पाटील घनकचरा व्यवस्थापन विभागातील देगलूरकर, जगताप ,पांढरे ,किस्मतराव,घुटे, मांजरेकर,धात्रक तसेच इतर कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होता.