नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोपर खाडीवरील रेल्वे पुलालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खननाबाबत व कांदळवनाची कत्तल होत असून कांदळवनाचे क्षेत्र नष्ट होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे Criminal Writ Petition No. २९११/२०२२ दाखल करण्यात आले आहे. या पार्शवभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी दि.३० मे २०२३ रोजीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कोपर, खाडीलगतच्या परिसरात मनाई हुकूम आदेश लागू केल्यास होणाऱ्या अवैध रेती उत्खननास व कांदळवनाच्या कत्तलीस प्रतिबंध करता येईल, असे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, अति.कार्य, विशेष शाखा, ठाणे शहर श्री. राजेंद्र दाभाडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कोपर खाडी किनारी क्षेत्रामध्ये दुपारी 12:01 ते रात्री 12:०० या कालावधीत कोपर खाडी किनारी रेल्वे पुलालगतच्या परिसरात बंदी आदेश जारी केले आहे.
हा मनाई आदेश दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी 12:01 ते दि. ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी 12.०० वा पर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, अति.कार्य, विशेष शाखा, ठाणे शहर राजेंद्र दाभाडे यांनी कळविले आहे.