नवी दिल्ली / प्रतिनिधी – भारतीय रेल्वेच्या (2018 तुकडी) 255 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या गटाने राष्ट्रपती भवनच्या सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भारतीय रेल्वे हा केवळ भारतीय अर्थव्यवस्थेचाच नव्हे तर भारताच्या एकात्मतेचा आणि सामाजिक-सांस्कृतिक विविधतेचा कणा आहे, असे राष्ट्रपतींनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. रेल्वे व्यवस्थेचा समृद्ध वारसा पुढे नेण्याची आणि भारतीय रेल्वेला जगातील सर्वोत्कृष्ट दर्जाची सेवा देणारी रेल्वे बनवण्यासाठी प्रयत्न करणे ही तुमच्यासारख्या तरुण अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, यावर त्यांनी भर दिला.
तंत्रज्ञान हे आज सर्व क्षेत्रांना चालना देणारी शक्ती आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. दररोज लाखो लोकांच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करणाऱ्या आणि दर महिन्याला लाखो टन मालवाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेसाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे, हे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. लोकस्नेही आणि पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्थेसाठी नवीन अॅप्लिकेशन्स आणि यंत्रणा तयार करून देशाच्या तांत्रिक प्रगतीमध्ये नवे मार्ग तयार करण्यासाठी तरुण अधिकाऱ्यांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
रेल्वेमधून प्रवास करणारे लोक त्यांच्या प्रवासाच्या आठवणी सोबत घेऊन जातात, असे राष्ट्रपती म्हणाल्या. प्रवाशांचे पाहुण्यांप्रमाणे आदरातिथ्य करावे आणि त्यांना आवडेल अशी सर्वोत्तम सेवा आणि कायम स्मरणात राहील अशी अनुभूती द्यावी , असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्व प्रकारची खात्री करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली . रेल्वे सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता -आधारित-अॅप्लिकेशन्ससह प्रभावी आणि निर्दोष प्रणाली तयार केल्या पाहिजेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले.