नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. तर दुसरीकडे अवघ्या देशाचे नाशिककडे देखील लक्ष असणार आहे. याचं कारण म्हणजे २२ आणि २३ जानेवारी रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. २२ तारखेला उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि गोदाकिनारी आरती करतील. तर २३ जानेवारी रोजी ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. सायंकाळी त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
ठाकरे गटाच्या वतीने या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. ७० बाय ४० फूट आकाराचे मुख्य स्टेज उभारण्यात आले असून, १२ फूट आकाराचा रॅम्प असणार आहे. या मुख्य स्टेजसमोर विशेष २ हजार निमंत्रित व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था असेल. यात खासदार, आमदार, अंगीकृत संघटनांचे अध्यक्ष यांचा असणार समावेश असेल. तर या सभेसाठी जवळपास ७० हजार लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. उद्धव ठाकरे या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून असे दिसत आहे की ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेली दिसून येत आहे.