नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिकचा दिंडोरी मतदारसंघ हा 2009 पासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा निवडणुकीच्या रिंगणात केंद्रीय मंत्री आणि बीजेपीच्या उमेदवार भारती पाटील, वंचित कडून मालती ढोमसे त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भास्कर एम. भगरे निवडणुकीच्या मैदानात आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार मालती ढोमसे यांच्या प्रचारार्थ आयोजित पिंपळगाव बसवंत येथील प्रचार सभेत वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर शाब्दिक हल्ला केला. ते म्हणाले कांदा उत्पादकांचे महाराष्ट्र हे आगार आहे. पण, राज्यातील आणि या भागातील शेतकऱ्याला केंद्र सरकारने वाऱ्यावर सोडलय. गुजराती व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठी मोदीने देशातील शेतकरी मारला. गुजराती शेतकऱ्याला कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आणि महाराष्ट्रातील शेतकरी मारला. मोदी देशाचे पंतप्रधान आहे की गुजरातचे? ज्याने फक्त गुजराती व्यापाऱ्यांचा फायदा केला. कांद्याचा भाव खाली वर करणे हे व्यापारी आणि सरकारचा खेळ आहे. मालतीताई दिंडोरी मतदारसंघातून निवडून आल्यास सर्वात आधी कांद्याचे धोरण ठरवतील.
“काही महिन्यांपूर्वी टोमॅटोचे भाव 15 रुपये किलोवरून 150 रुपये किलोपर्यंत अचानकपणे गेले होते. हा कृत्रिम तुटवडा व्यापाऱ्यांनी निर्माण केला होता. यातून व्यापाऱ्यांनी 45 हजार कोटी रुपये काही महिन्यात सामान्य लोकांकडून लुटले. जो कोणी व्यापारी शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव देईल, त्याला शिक्षा व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन देशात केले होते. पण, मोदीने हा कायदा केला नाही. आम्ही सत्तेत आल्यास हा कायदा करू.” असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस दिले.
“इथल्या शिवसेनेच्या खासदाराने संसदेत कधीच मागणी केली नाही की, राफेल विमानांची निर्मिती ओझरच्या एचएएलच्या कारखान्यात करण्यात यावी. या कारखान्यात लढाऊ विमाने बनवायचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इथून ‘वंचित’ चा उमेदवार निवडून आल्यास या माध्यमातून आम्ही इथल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देऊ.” असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
आंबेडकर म्हणाले “ओझरमध्ये HAL हा विमान निर्मितीचा शासकीय कारखाना आहे. भारताने राफेल विमान खरेदीचा करार केला होता, तेव्हा 100 विमाने भारतात तयार होतील, असा निर्णय झाला होता. त्यावेळी सर्वांची मागणी होती की, देशभरातील एचएएलच्या कारखान्यात ह्या लढाऊ विमानांची निर्मिती व्हावी मात्र, पंतप्रधान मोदीने हे विमाने बनवायचे कंत्राट अनिल अंबानीला दिले. मात्र, अनिल अंबानीला लढाऊ विमाने बनवायचा कोणताही अनुभव नाही. हा विमान निर्मितीचा कारखाना कोठे आहे?” हेही लोकांनां माहिती नसल्याची टीका त्यांनी केली.