नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या संकल्पना, उपाय आणि कृती आमंत्रित करण्याच्या उद्देशाने प्रज्वला चॅलेंज या उपक्रमाचा दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण चरितार्थ मिशनने(DAY-NRLM) प्रारंभ केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बदल करण्याची क्षमता असलेल्या व्यक्ती, सामाजिक उद्योग, स्टार्ट अप, खाजगी क्षेत्र, नागरी समाज, समुदाय आधारित संघटना, शैक्षणिक संस्था, स्टार्ट अप्स, इन्क्युबेशन सेंटर्स, गुंतवणूकदार इत्यादींकडून संकल्पना आमंत्रित करणारा हा मंच आहे. ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव शैलेश कुमार सिंग यांनी 29 डिसेंबर 2022 रोजी प्रज्ज्वला चॅलेंजचा प्रारंभ केला. नवोन्मेषी तंत्रज्ञान तोडग्यांशी संबंधित संकल्पना आणि उपाय, समावेशक वृद्धी, मूल्य साखळी हस्तक्षेप, वाढीव महिला उद्योजकता, किफायतशीर तोडगे, शाश्वतता, स्थान आधारित रोजगार, स्थानिक मॉडेल्स इ. चा शोध घेण्याचा या मिशनचा प्रयत्न आहे.
यासाठी 29 डिसेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज पाठवता येतील. अंतिम चाळणी फेरीसाठी निवड झालेल्या संकल्पनांना मिशनकडून मान्यता दिली जाईल आणि तज्ञांच्या पॅनेलकडून मार्गदर्शक पाठबळ आणि पुढची वाटचाल करण्यासाठी इन्क्युबेशन पाठबळ दिले जाईल. यातून निवड झालेल्या सर्वोत्तम पाच संकल्पनांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे पुरस्कार दिले जातील. अर्जदारांना www.prajjwalachallenge.com या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करता येईल.
जास्त प्रमाणात अर्जदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रज्ज्वला चॅलेंजचा तपशील प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या मंथन पोर्टलवर आणि बिमटेक अटल इनोव्हेशन मिशन पोर्टलवर सामाईक करण्यात आला आहे.