नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – दहशत माजविण्याच्या इराद्याने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला धुळे एलसीबीच्या पथकाने निजामपुरातून ताब्यात घेतले. या तरुणाकडून ४० हजार रूपये किंमतीच्या गावठी कट्ट्यासह एक हजार रूपये किंमतीचे काडतूस मिळून एकूण ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सकाळी धुळे एलसीबीचे निरिक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, करण जगन शिंदे (२६) रा. पातलनगरी, निजामपूर हा तरुण दहशत पसरविण्याच्या उद्देशाने स्वतः च्या कब्जात गावठी कट्टा बाळगुन आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पोलिस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते पथकाने निजामपूर गावात संशयित तरुणाचा शोध घेतला असता तो बसस्थानक परिसरात आढळून आला.
सदर इसमाची पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता ४० हजार रूपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा) व एक हजार रूपये किंमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. करण शिंदे याचे विरुध्द धुळे एलसीबीचे पो शि गुणवंतराव पाटील यांचे फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.