नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बुलढाणा/प्रतिनिधी – बुलढाण्यात लोकसभा निवडणुकीची सुरुवात आजपासून झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यातील नागरीक आज सज्ज झाले. तसेच बुलढाणा मतदार संघातील उमेदवार प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या या काळात अनेकदा मतदारांची दिशाभूल केली जाते. समाजात तेढ निर्माण होईल तसेच राजकीय पक्षावर निशाणा ठेऊन चुकीचे फोटो, मेसेज वायरल केले जातात, तसेच खोट्या अफवा पसरवल्या जातात.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज फिरत असून, त्यात साडेचार कोटी रुपयांची रक्कम बुलढाण्यातील मेहकरमध्ये जप्त केल्याचे म्हटले आहे. या मेसेजमध्ये शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना पकडण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेखही व्हायरल मेसेज मध्ये करण्यात आला आहे. मात्र, बुलढाणा पोलिसांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले असून, अशी कोणतीही घटना बुलढाणा जिल्ह्यात झाली नसल्याचे सांगितले आहे. व्हायरल होणारा मेसेज हा फेक असल्याचे स्पष्टीकरण बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिले आहे. मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, मॅसेज तयार करणाऱ्यांचा शोध सायबर सेल कडून घेण्यात येत असल्याचेही जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने या सांगितले आहे. तसेच कोणत्याही खोट्या अफवा किंवा मेसेजला बळी न पडता मतदारांनी निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.