प्रतिनिधी.
नवी मुंबई – कोव्हीड १९ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करताना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेतले आहे. या अनुषंगाने अर्ध्या तासात त्वरित तपासणी अहवाल हातात येणाऱ्या रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र तैनात असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रकृतीबद्दलच्या आस्थेने आज आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अॅन्टीजेन टेस्टला प्रारंभ करण्यात आला आणि पहिल्याच दिवशी 655 टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 20 व्यक्तींचे पाॅझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून त्यांचे त्वरित विलगीकरण करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 4700 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे.