नेशन न्यूज मराठी टीम.
सांगली / प्रतिनिधी – राज्य शासनाने कंत्राटी कामगार भरतीचा जी आर काढला आहे. या निर्णयाने रोजगाराचे प्रश्न न सुटता अधिक गुंतागुतीचे होणार आहेत. याचसाठी राज्यात निषेध व्यक्त केला जातोय. कंत्राटी भरतीविरोधात सांगलीत वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा काढला गेला होता. राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा सरकारी आस्थापनांमध्ये विविध पदांसाठी कंत्राटी कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी, ९ खाजगी एजन्सींची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी क्षेत्रातील SC, ST, OBC साठी आरक्षण संपवायचे आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला.
कंत्राटी कर्मचारी पद भरती निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
मोर्चा संबोधित करताना ते म्हणाले की, जो कंत्राटीचा जीआर काढला आहे हे खासगीकरणासाठीच पाहिलं पाऊल आहे. यांना आपल्या अंगणवाड्या, सरकारी दवाखाने बंद पाडायचे आहेत. दलित, बहुजन, मुसलमानांना, वंचित समूहांच्या प्रगती करण्याचा मार्ग बंद करायचा आहे. त्यांची खेळी लक्षात घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. एका बाजूला मनुवादी, ब्राह्मणवादी, अर्ध्या चड्डीवाले, धारकरी, एका बाजूला बसलेले आहेत. त्यांनी एक व्यवस्था बनवली आहे, एक खोली तयार केली आहे. पण त्या खोलीमध्ये जेव्हा वंचित समाजातला व्यक्ती जायचा प्रयत्न करतो तेव्हा हे दार बंद करून घेतात.
आपल्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं. प्रगतीचा एक रस्ता दाखवला आहे. ब्राह्मण्यवादी तुम्हाला या व्यवस्थेत घेत नाहीत. पण, तरी सुद्धा आम्ही त्यात घुसून दाखवणार. तुम्ही दारं उघडली, नाही तर आम्ही लाथ मारून ते दार उघडणार आहोत. दार तोडण्याची वेळ येईपर्यंत तिथे पोहचण्याचा रस्ता बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली. जो कंत्राटीचा जीआर काढून खासगीकरणाचा करण्याच त्यांचा प्रयत्न आहे. हे तर पहिलं पाऊल आहे, त्यांचा पुढचा हल्ला हा आरक्षणावर असणार आहे, असा सूचक इशारा त्यांनी मोर्चात मांडला. स्पर्धा परिक्षा होतात त्यात आरक्षण असत, जर आता कंत्राटी पद्धतीने जर काम होऊ लागली आणि काम मिळू लागली, तर हे लोक कंत्राट भरतीमध्ये आरक्षण लावतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इथल्या दलित, आदिवासी, मुस्लिम, सर्व वंचित समाजातील तरुण आहेत. जे शिक्षण घेऊन बाबासाहेबांच्या मार्गावर चालतात. त्या सर्वांना या व्यवस्थेतून बाहेर पाडण्याचा हा डाव आहे. त्यासाठी त्यांनी ही कंत्राटीकरणाची व्यवस्था चालू केली आहे. जनतेने त्यांना एक संदेश दिला पाहिजे, तुम्ही ही कंत्राटी व्यवस्था लावा आणि प्रयत्न करा पण, येत्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकून टाकू असा वक्तव्य त्यांनी या मोर्चाला संबोधित करतांना केले. या मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुखे, संतोष सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.