नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – डोंबिवली पश्चिमकडून पूर्वेला ठाकुर्ली चोळेगावकडे जाणारी वाहने ही बावनचाळ, ठाकुर्ली ब्रिजवरून पुढे ठाकुर्ली स्टेशनकडे जाण्यासाठी जोशी स्कूलजवळ नवीन ठाकुर्ली पूल संपल्यानंतर यु टर्न घेवून डावे वळण घेतात. त्यामुळे ठाकुर्ली स्टेशनकडून येणारी व डोंबिवली पश्चिमकडून ठाकुर्ली स्टेशनकडे जाणारी वाहने समोरासमोर येतात. या ठिकाणी वळणावर रस्ता अरूंद असल्याने समोरासमोर येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होवून वाहनचालकांमध्ये वाद होतात. तसेच किरकोळ अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे ठाकुर्ली ब्रिजवरून पुढे ठाकुर्ली परिसरात स्टेशनकडे जाण्यासाठी जोशी हायस्कुलजवळ यु टर्न बंद करुन वाहतुकीत पुढील पंधरा दिवस प्रायोगित तत्वावर बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतुक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीतील बदल पुढील प्रमाणे :
प्रवेश बंद :- (1) डोंबिवली पश्चिमेकडून बावनचाळ, ठाकुर्ली ब्रिज संपल्यानंतर जोशी हायस्कूलजवळून डावे वळण घेवून ठाकुर्ली -चोळेगावकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जोशी हायस्कूल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- सदरची वाहने सरळ पुढे जावून नाना कानविंदे चौक येथून डावे वळण घेवून पंचायत बावडी मार्गे इच्छीत स्थळी जातील. ही अधिसूचना प्रसिध्द झाल्या तारखेपासून 15 दिवस प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येत आहे.
काही हरकत अगर सुचना असल्यास त्या लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त, शहर वाहतुक शाखा कार्यालय, तीन हात नाका, एल. बी. एम. मार्ग, ठाणे ४००६०२ येथे पाठवाव्यात. याबाबत कोणाच्या काही हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास सदरची अधिसूचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपात अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्ण्वाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतुक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.