नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – सरकारने बांबू चारकोल वरील “निर्यात बंदी ” हटवली आहे, यामुळे अपरिपक्व बांबूचा पुरेपूर वापर आणि भारतीय बांबू उद्योगात नफ्याचे प्रमाण वाढवण्याला मदत होईल.देशातील बांबू-आधारित हजारो उद्योगांच्या पाठीशी असणारा खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) सरकारला बांबू चारकोलवरील निर्यात निर्बंध हटवण्याची सातत्याने विनंती करत होता. केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून व्यापक फायद्यासाठी बांबू चारकोलवरील निर्यातबंदी हटवण्याची मागणी केली होती.
“चारकोल बनवण्यासाठी लागणारा बांबू वैध स्रोतांकडून मिळवला आहे हे सिद्ध करणारे योग्य दस्तावेज / मूळ प्रमाणपत्र असेल तरच असा बांबू चारकोल निर्यात करण्यास परवानगी आहे,” असे परकीय व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
धोरणातील बदलासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष सक्सेना यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे आभार मानले . ते म्हणाले की , या निर्णयामुळे कच्च्या बांबूचा उत्पादन खर्च कमी होईल आणि बांबूवर आधारित उद्योग, मुख्यतः दुर्गम ग्रामीण भागातील, बांबू व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर होऊ शकेल. “बांबू चारकोलला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे आणि सरकारने निर्यात बंदी उठवल्यामुळे भारतीय बांबू उद्योगाला या संधीचा फायदा घेता येईल आणि मोठ्या जागतिक मागणीच्या संधीचा लाभ घेता येईल. यामुळे वाया जाणाऱ्या बांबूचा सुयोग्य वापर करणे देखील शक्य होईल आणि टाकाऊ वस्तूंमधून संपत्ती निर्माण करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोन देखील प्रत्यक्षात साकारता येईल.
बांबू चारकोलच्या निर्यातीमुळे वाया जाणाऱ्या बांबूचा पूर्ण उपयोग होईल आणि त्यामुळे बांबूचा व्यवसाय अधिक फायदेशीर होणार आहे. बार्बेक्यू, माती पोषण आणि सक्रिय चारकोल निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून वापरल्या जाणाऱ्या बांबू चारकोलला अमेरिका, जपान, कोरिया, बेल्जियम, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि ब्रिटन यांसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठी संधी आहे.