नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीत काल पासून यांचा दौरा सुरू आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या पदधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कल्याण डोंबिवली केलेल्या दौऱ्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी सध्या लोकसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत राज्यकर्त्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नव्हतं, अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नाही, लोकांनी यांना वठणीवर आणले पाहिजे. जोपर्यंत लोक वठणीवर आणत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण करतोय ते योग्यच असंच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणखी चिखल होणार. आपण आज म्हणून बघतोय, अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात मात्र त्यांच्यासमोरच राजकारण सुरू आहे. ते पाहून तरुण वर्ग राजकारणात येणार नाही, या गोष्टीचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे,अन्यथा महाराष्ट्राच काही खरं नाही.
महाराष्ट्रातले महापुरुष जातीमध्ये विभागून टाकलेत, आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले यावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी जगभरात बॅलेट पेपरवर मतदान होत असताना आपण वोटिंग मशीन का वापरतोय, असा सवाल केलाय. राज ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. काल कल्याण मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आज राज ठाकरे यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.
राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत बोलताना राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात, महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवतोय असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतची मागणी अद्याप पूर्ण झालेले नाही. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही तर राज्यात राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत, तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असे सांगितले.
राज ठाकरे गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर बोलताना म्हणाले की, एखादा माणूस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करण्यासारखी टोकाची भूमिका घेतो. त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
यावेळी आमदार राजू पाटील, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, अभिजीत पानसे, प्रकाश भोईर, राहुल कामत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांना निवडणूक कामे देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग पाच वर्षे काय काम करते निवडणुक आयोगाला यंत्रणा पाच वर्षात उभी करता येत नाही का? शिक्षकांनी मुलांना शिकवायचं सोडून ही काम करायचं का? असा सवाल करत शाळा संपल्यावर शिक्षकांना निवडणूकीच्या कामाला लावणार असा काही निर्णय घेतलाय हे करून तर बघा असा इशारा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.