नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्व्च्छतेविषयी जागरुकता वाढविणे व वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करुन पर्यावरणाची स्थिती सुधारण्याकरिता प्रयत्न करणे, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सोसायटयांमध्ये “कचरामुक्त तारांकीत सोसायटी स्पर्धा” आयोजित करण्यात आलेली असून खालील मुद्यांच्या अनुषंगाने उत्कृष्ट सोसायटीची निवड करण्यात येणार आहे. उत्कृष्ट सोसायटयांना रोख पुरस्कार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाणार आहे.
यामध्ये सोसायटीत करण्यात येणारे दैनंदिन कच-याचे वर्गीकरण, सोसायटी आवारात दैनंदिन स्वरुपात करण्यात येणारी स्वच्छता, सोसायटी मध्ये राबविण्यात येणारे ओल्या कच-यावरील सेंद्रिय खताचे प्रकल्प, सोसायटी मध्ये एकल वापर प्लॅस्टिक बंदीची 100% अंमलबजावणी करणे, सोसायटी परिसर आणि सोसायटी समोरील अथवा बाजूच्या रस्त्यालगत अथवा सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करणे, सोसायटीच्या इमारतीवर पावसाच्या पाण्याचे संधारण (रेन वॉटर हार्वस्टिंग) करणे, सोसायटीच्या इमारतीवर सौर उर्जा प्रकल्प (सोलर वॉटर हिटर/सोलर एनर्जी सिस्टम) उभारणे, सोसायटी पार्किंग परिसर आणि पावसाचे पाणी वाहून नेणारे छोटे नाले किंवा वाहिन्या (स्ट्रॉम वॉटर ड्रेन) स्वच्छ असणे, मॅटेनन्स स्टाफ आणि व्यावसायिक गाळेधारक दुकानदार व कामगार यांच्यासाठी कॉमन सोसायटी शौचालयाची व्यवस्था असणे तसेच सोसायटी मधील इलेक्ट्रीक वाहनांची संख्या या मुद्यांचा अंतर्भाव आहे.
स्पर्धेसाठी दि.20 जानेवारी 2024 ते दि.31 जानेवारी 2024 या कालावधीत अर्ज स्विकारले जाणार असून स्पर्धेचा कालावधी दि.1 जानेवारी ते दि.31 मार्च 2024 पर्यंत असेल. सोसायाटी फिल्ड असेसमेंट दि.1 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 या दरम्यान केली जाईल.
यामध्ये तळ+6 किंवा त्यापेक्षा कमी (Multi_Story Building) या गटात प्रथम क्रमांकास – रु.15,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकास – रु.10,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास – रु.5,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.
तळ+7 ते तळ+16 (Middle to Small High Rise Building) या गटात प्रथम क्रमांकास – रु.15,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकास – रु.10,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास – रु.5,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.
तळ+17 ते त्याहून जास्त (High Rise Building) या गटात प्रथम क्रमांकास – रु.15,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकास – रु.10,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास – रु.5,000/- प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त सोसायटयांनी “कचरामुक्त तारांकीत सोसायटी स्पर्धा” मध्ये सहभाग घेवून महानगरपालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर राखण्यास महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांचेमार्फत करण्यात येत आहे.